बेळगाव लाईव्ह:“सगळे सरकारी नोकर प्रामाणिक निघाले तर काय होईल?” असा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो. या प्रश्नाचे उत्तर मात्र बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बस डेपोमध्ये प्रत्यक्ष कृतीतून मिळाले आहे.
खानापूर आगारातील एका बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग बसमध्येच चुकून राहून गेली. ही बाब लक्षात येताच बस चालक आणि बस वाहकाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रामाणिकपणा दाखवला.
बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्रवाशांशी संपर्क साधत पूर्ण पारदर्शकता ठेवून बॅग सुरक्षितपणे परत करण्यात आली.
आजच्या काळात सरकारी यंत्रणेकडे संशयाने पाहिले जाते. मात्र खानापूर बस डेपोमधील या चालक-वाहकांच्या वागणुकीमुळे “सरकारी नोकर म्हणजे विश्वास” ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जर अशीच सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी प्रत्येक सरकारी कार्यालयात दिसू लागली, तर नागरिकांचा शासनावरील विश्वास किती दृढ होईल, याची कल्पनाच केलेली बरी!
या घटनेनंतर प्रवाशांनी बस चालक व वाहकांचे मनःपूर्वक आभार मानले, तर स्थानिक नागरिकांकडूनही त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
एक छोटीशी प्रामाणिक कृती… पण समाजाला मोठा संदेश देणारी.
खानापूर बस डेपोतील हा प्रसंग केवळ बॅग परत मिळण्यापुरता मर्यादित न राहता,
“सरकारी सेवा ही केवळ नोकरी नाही, ती समाजाप्रती जबाबदारी आहे” हे पुन्हा एकदा ठसवणारा ठरला आहे.
२५ डिसेंबर २०२५ रोजी खानापूर आगारातील अनुसूची क्रमांक ८५, वाहन क्रमांक F-1431 या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग चुकून बसमध्येच राहून गेली होती.
प्रवास संपल्यानंतर बसची नेहमीप्रमाणे तपासणी करत असताना बस चालक गोपाळ रंजेरी (कर्मचारी क्र. २६२८६) आणि बस वाहक (तिकीट तपासणीस) पुजारी यांच्या निदर्शनास ही बॅग आली. कोणताही गैरवापर न करता त्यांनी तात्काळ बॅग उघडून पाहिली असता, त्यामध्ये आधार कार्ड, मौल्यवान दागिने व इतर महत्त्वाच्या वस्तू असल्याचे आढळून आले.

आधार कार्डवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे चालक व वाहकांनी संबंधित प्रवाशांशी संपर्क साधला. आधार कार्डवर विक्रम विठ्ठल कांबळे, आंबेडकर गल्ली, बैलूर असे नाव होते. काही वेळातच विक्रम कांबळे यांच्या पत्नी व त्यांचे वडील विठ्ठल कांबळे खानापूर बस डेपोमध्ये दाखल झाले.
चौकशीअंती ही बॅग विक्रम कांबळे यांच्या पत्नी यांनीच बसमध्ये विसरल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर खानापूर बस डेपोचे संचार निरीक्षक विठ्ठल कांबळे व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व नोंदी पूर्ण करून बॅग व त्यातील सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे प्रवाशांकडे सुपूर्द करण्यात आल्या.




