बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहापूर येथील शिवसृष्टीसमोरील रस्त्याच्या मालकी हक्काचा आणि भरपाई देण्याच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धारवाड खंडपीठाने या प्रकरणात 25 हजार रुपयांचा दंड ठोठावून जामिनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर हा वाद अधिकच गंभीर झाला आहे.
उच्च न्यायालयाने या रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात गारगट्टी कुटुंबाला 2.18 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्मार्ट सिटी विभागाने आपल्याकडे ही रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत हा रस्ता बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित असून त्यामुळे रस्ता अधिकृतपणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही.
स्मार्ट सिटी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे — 2.18 कोटी रुपयांची भरपाई नेमकी कोण देणार?

यापूर्वी याच रस्त्यासाठी 20 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. त्यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर जोरदार वाद झाला होता. त्या वेळी महानगरपालिकेने स्मार्ट सिटी विभागालाच जबाबदार धरले होते. तत्कालीन स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक आफ्रिनबानो बल्लारी यांनी रस्ता महानगरपालिकेच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’नंतरच बांधण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच, स्मार्ट सिटीने केवळ रस्ता बांधकाम केले असून भरपाई देणे हे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
सध्या मात्र 2.18 कोटींची भरपाई महानगरपालिकेनेच द्यावी, असे सांगण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले बहुतांश रस्ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. मात्र, शहापूर येथील शिवसृष्टीसमोरील या रस्त्याचा हस्तांतरण प्रस्ताव अद्याप राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे पुढील कारवाई आता सरकारच्या निर्देशांवर अवलंबून आहे.
दरम्यान, सध्याच्या स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक कविता वारंगल या न्यायालयात हजर राहून रस्त्यासंदर्भातील सर्व माहिती सादर करणार आहेत. स्मार्ट सिटी विभागाने भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे आता ही जबाबदारी शहर प्रशासनाकडे सरकत असल्याचे चित्र असून, पुढील टप्प्यातील जबाबदारी निश्चितीची लढाई रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




