बेळगाव लाईव्ह : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटातील ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
गेली १८ वर्षे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेल्या खांडेकर यांनी फुटीच्या काळातही उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. मात्र, भविष्यातील समाजकारण आणि विकासाचा विचार करून त्यांनी आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने जोपासले जात आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून तळागाळातील लोकांची विकासकामे करणे शक्य आहे.
महाराष्ट्रातील जनतेचा या सरकारवर विश्वास असून, समाजकारणाला येथे मोठा वाव आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे.”
खांडेकर यांच्या या निर्णयामुळे चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज विभागात उबाठा गटाची मोठी हानी मानली जात आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध आणि महायुतीची ताकद वापरून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. खांडेकरांच्या या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




