बेळगाव लाईव्ह : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकाराने चालवल्या जाणाऱ्या ‘शांताई -सेकंड चाइल्डहुड’ या वृद्धाश्रमाने पुन्हा एकदा बेळगावला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या वृद्धाश्रमाच्या सदस्य ज्यांना ‘बेळगावच्या व्हायरल आजी’ म्हणून ओळखले जाते, त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.
शांताई वृद्धाश्रमातील आजींनी यापूर्वी ‘सारेगमप’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय मंचांवर आपली कला सादर करून आणि टी-सीरीज व झी म्युझिकसारख्या आघाडीच्या संगीत कंपन्यांसोबत काम करून देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला असून आता त्यांची लोकप्रियता नव्या उंचीवर पोहोचली आहे.
कारण त्यांनी बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नवीनतम व्हायरल व्हिडिओमध्ये या आजींनी अभिनेता कार्तिक आर्यन, रेमो डिसूझा आणि अनन्या पांडे यांच्यासोबत एका विशेष रीलसाठी एकत्र काम केले आहे. हा रील देशभरात ट्रेंड होत आहे. शांताईच्या आजींच्या वाढत्या लोकप्रियतेमागील एक प्रमुख शक्ती म्हणजे चेरिल विजय मोरे ही आहे.
जिच्या सर्जनशील रील्स आणि हृदयस्पर्शी कथाकथनाने या उपक्रमाला एका नवीन उंचीवर नेले आहे. त्यामुळे शांताईतील ज्येष्ठ नागरिकांच्या आपुलकीला आणि आकर्षणाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे.
बॉलीवूड कलाकारांचे सहकार्य बेळगावसाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण असून जो दाखवून देतो की समाजाकडून एकेकाळी विसरल्या गेलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता प्रचंड प्रेम, आदर आणि ओळख मिळत आहे. त्यांची आनंदी ऊर्जा त्यांच्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देत असून बेळगाव शहरावर एक नवा प्रकाश टाकत आहे.




