बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मराठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आज आपला १४८ वा स्थापना दिन साजरा करत आहे.
२६ डिसेंबर १८७७ रोजी सांगली संस्थानच्या पटवर्धन राजांनी ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने या शाळेची स्थापना केली होती. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे मराठी शाळांची संख्या घटत आहे, तिथे ही शाळा आपला वारसा समर्थपणे जपत आहे. शुक्रवारी या शाळेतील विद्यार्थ्यांनी 148 वा वर्धापन दिन साजरा केला.
सध्याच्या काळात पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळत आहे. यामुळे अनेक सरकारी मराठी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम झाला असून, काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
मात्र, सांबरा येथील या शाळेने आपली गुणवत्ता टिकवून ठेवत १९० विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राखली आहे. १९७३ मध्ये या शाळेला ‘आदर्श शाळा’ आणि २००७-०८ मध्ये ‘मॉडेल स्कूल’चा दर्जा देऊन शासनाने या शाळेच्या शैक्षणिक योगदानावर शिक्कामोर्तब केले आहे.

अलीकडच्या काळात कर्नाटक सरकारकडून सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधा आणि विलीनीकरणाबाबत विविध धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही सांबरा शाळेने आपले अस्तित्व आणि मराठी भाषेचा स्वाभिमान टिकवून ठेवला आहे. सांगली संस्थानिकांनी शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचे जिवंत उदाहरण म्हणून या शाळेकडे पाहिले जाते.
ग्रामीण भागातील शेकडो पिढ्या घडवणाऱ्या या शाळेने केवळ साक्षरता न देता संस्कारांचे बाळकडूही दिले आहे. १४८ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेली ही शाळा आजही नव्या उमेदीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून, बदलत्या शैक्षणिक धोरणांशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाची कासही धरत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांबरा शाळेचे योगदान मैलाचा दगड ठरत असल्याची प्रतिक्रिया शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.




