बेळगाव लाईव्ह : काही महिन्यांपूर्वी बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या समारंभादरम्यान तत्कालीन हुबळी–धारवाड अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण भरमणी यांच्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हात उचलल्याच्या कथित प्रकरणात जनप्रतिनिधींच्या न्यायालयाने दिलेला तक्रार फेटाळण्याचा आदेश आव्हान देत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी दिली.
सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असलेल्या नारायण भरमणी यांच्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हात उचलून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाबाबत बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी बंगळुरू येथील जनप्रतिनिधींच्या न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही तक्रार फेटाळून आदेश दिला आहे.
बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या समारंभादरम्यान व्यासपीठावर भाषण करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नारायण भरमणी यांना दमदाटी केली, चढ्या आवाजात ओरडले तसेच त्यांच्यावर हात उचलून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी भारतीय दंड संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप गडाद यांनी केला.
राजकीय दबावामुळे कॅम्प पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी, “या घटनेत पीडित व्यक्तीने आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. तथापि, जर पीडित व्यक्ती तक्रार दाखल करेल, तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल,” असे म्हणत तक्रार अर्ज निकाली काढला होता, असेही त्यांनी सांगितले.

याच कारणास्तव या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी बंगळुरू येथील प्रसिद्ध वकील श्री. उमापती आणि सुधा कातवा यांच्यामार्फत जनप्रतिनिधींच्या न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती भीमप्पा गडाद यांनी दिली.




