बेळगाव लाईव्ह :मराठा सेंटर, बेळगाव यांच्या वतीने 07 डिसेंबर 2025 रोजी शिवाजी स्टेडियम येथे भव्य माजी सैनिक मेळावा उत्साहात पार पडला. निवृत्त सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पेन्शन, कागदपत्रे, बँकिंग आणि कल्याणविषयक तक्रारींचे एकाच ठिकाणी निराकरण करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्टेशन कमांडर व कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी भूषविले. लेफ्टनंट कर्नल हबीब, OIC रेकॉर्ड्स यांनी विविध रेकॉर्ड ऑफिसेस, सेवा संस्था आणि बँक प्रतिनिधी यांच्या सहभागाचे प्रभावी समन्वयन केले.
बेळगाव तसेच महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातून सुमारे 1,200 माजी सैनिक आणि वीर नारी मेळाव्यास उपस्थित राहिले. विविध शाखांच्या रेकॉर्ड ऑफिसेस, PCDA (P) प्रयागराज, CDA बेंगळुरू, PAO (OR) MARATHA LI, ZSO बेळगाव/धारवाड/विजयपूर, CPPC बेंगळुरू आणि अग्रगण्य बँकांनी थेट सेवा पुरवल्या.

कँटोनमेंट बोर्ड हॉस्पिटल आणि मिलिटरी हॉस्पिटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसमावेशक वैद्यकीय शिबिर भरविण्यात आले. ईएचसीएस पॉलिक्लिनिक व मिलिटरी डेन्टल सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टर्सने आरोग्य तपासणी केली. SPARSH, आधार, PAN, DLC आणि AWPO संबंधित सेवा मराठा सेंटरने तत्काळ उपलब्ध करून दिल्या.
कार्यक्रमात वीर नारींचा सन्मान ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्टेशन मुख्यालय, बेळगाव तर्फे सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात आली.


