बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नेमून दिलेल्या स्थळाएवजी शेतकऱ्यांनी अचानक हालगा येथे सर्व्हिस रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर विस्कळीत झाल्याची घटना आज दुपारी घडली.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या अधिवेशनादरम्यान सुवर्णसौध परिसरात मोठ्या संख्येने आंदोलने केली जातात. त्यासाठी प्रशासनाकडून आंदोलन करणाऱ्यांसाठी ठराविक जागा निघून देण्यात आले आहेत.
आंदोलनामुळे सुवर्णसौध समोरील राष्ट्रीय महामार्ग त्याचप्रमाणे आसपासच्या इतर मार्गावरील वाहतूक आंदोलन आंदोलनामुळे प्रभावित होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. तथापि काही शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आज दुपारी अचानक हालगा येथे सर्व्हिस रोडवरच ठिय्या आंदोलन सुरू करून वाहतूक रोखून धरली.
शेतकऱ्यांचा हा रास्तारोको जवळपास तासभर सुरू राहिल्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन विस्कळीत झाली होती. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागून स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. बी. एस. येडीयुरप्पा रोड जवळील मालिनी सिटी येथे भाजपाने आंदोलन व मोर्चा हाती घेतल्यामुळे तेथील एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला होता.
त्यामुळे वाहनचालकांना हेलपाटे खाण्याचा त्रास सोसावा लागला. आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अखेर शेतकऱ्यांची कशीबशी समजूत काढली. तसेच मंत्र्यांची भेट घालून देतो असे आश्वासन देऊन पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना सुवर्ण विधानसौध परिसरात उभारण्यात आलेल्या आंदोलनासाठी असलेल्या मंडपाच्या ठिकाणी आणून सोडले. या पद्धतीने तास -दीड तासानंतर हालगा येथील सर्व्हिस रोड रहदारीसाठी पूर्वत खुला करण्यात आला.





