बेळगाव लाईव्ह : गेल्या वर्षी सरकारच्या अधिवेशनादरम्यान 10 डिसेंबर रोजी लाठीचार्ज करून लिंगायत पंचमसाली समाजाचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ येत्या बुधवार दि.10 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे त्याच दिवशी सुवर्ण विधानसौधवर लिंगायत पंचमसाली समाजाचा भव्य मुक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती प. पू. श्री मृत्युंजय स्वामी यांनी दिली.
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. स्वामीजींनी सांगितले की, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी लिंगायत पंचमसाली समाजाचे आंदोलन गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे.
सरकारने गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी आमच्या हजारो आंदोलकांवर लाठीचार्ज करून आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. बेकादेशीररित्या केलेल्या या लाठीमारात असंख्य लिंगायत पंचमसाली बांधव जखमी झाले होते. त्यामुळे 10 डिसेंबर हा दिवस आम्ही ‘लिंगायत दौर्जन्यदिन’ म्हणून गांभीर्याने पाळणार आहोत.

तसेच त्या घटनेचा निषेध म्हणून येत्या बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बेळगावातील गांधी भवन येथून सुवर्ण विधानसौधवर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हजारो समाज बांधवांचा सहभाग असणाऱ्या या मोर्चाद्वारे गेल्या वर्षी लिंगायत बांधवांवर बेकायदेशीर लाठीमार करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले जावे.
तसेच लाठीमार होण्यास प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असल्यामुळे त्यांनी आमच्या समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली जाणार आहे असे सांगून त्याचप्रमाणे लिंगायत पंचमसाली समाजाच्या आमदार आणि खासदारांनी त्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबर रोजी दंडावर निषेधात्मक काळ्याफिती बांधून सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे, अशी आपली विनंती असल्याचे प. पू. श्री मृत्युंजय स्वामी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस लिंगायत पंचमसाली समाजाची प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

