बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण मतदार संघातील वाजपेयी आवास योजनेअंतर्गत घरांची निर्मिती करून ती लाभार्थींना सुपूर्द करावीत, या मागणीसाठी बेळगावच्या शहापूर, वडगाव, खासबाग येथील रहिवाशांनी आज सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन केले.
सदर आंदोलनाप्रसंगी शहापूर, वडगाव, खासबाग येथील स्त्री -पुरुष रहिवाशांनी जोरदार निदर्शने करून काँग्रेस आणि भाजप सरकारसह बेळगाव महापालिकेचा धिक्कार केला.
आपल्या मागणी संदर्भात आंदोलनकर्त्यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव महानगरपालिकेकडून गेल्या 2012 मध्ये वाजपेयी आवास योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी जवळपास 300 गरीब कुटुंबांनी कर्ज काढून, हात उसने पैसे घेऊन सदर योजनेअंतर्गत प्रारंभी 50 हजार आणि त्यानंतर 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तथापि आजतागायत संबंधितांपैकी कोणालाही घरे मंजूर झालेली नाहीत.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास जागा मंजूर झाली आहे, लवकरच निविदा मंजूर होतील आणि त्यानंतर लवकरच घरांचे बांधकाम हाती घेतले जाईल अशा प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. तथापी आज 12 वर्षे होत आली तरी अद्यापही आम्हाला घरे मिळालेली नाहीत.
गेल्या 20 -30 वर्षापासून आम्ही बेळगाव दक्षिण मतदार संघात वास्तव्य असून रोजंदारीवर आमचा उदरनिर्वाह करत आहोत. सध्या भाड्याच्या घरात राहत असलेल्या आम्हा सर्वांना घरभाडे भरणे कठीण झाले आहे. तरी संबंधित श्री वाजपेयी आवास योजना तात्काळ कार्यान्वित करून आम्हाला आमची घरे बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहे, असे सांगितले.




