बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या 3 कि.मी. अंतराच्या परिघामध्ये आज सोमवारी 1 डिसेंबरपासून 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश बेळगावचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी व शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी जारी केला आहे.
कर्नाटक सरकारच्या 8 ते 19 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 3 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 2012 पासून म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यापासून विविध संघटना व कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी आंदोलने, सत्याग्रह, धरणे आंदोलने केली जातात. यातून काहींसंदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
यापूर्वी अशा आंदोलनातून 27 गुन्हे नोंद झाले असून 73 पोलीस कर्मचारी व 21 नागरिक जखमी झाले होते. सुवर्ण विधानसौध समोरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 42 हा जातो. महामार्गावरील आंदोलनामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
आंदोलनामुळे वाहतूक, आपत्कालीन सेवा व आर्थिक व्यवहार बाधित होऊ नये म्हणून उपरोक्त आदेश लागू करण्यात आला आहे. याखेरीज अलीकडे म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे त्याचाही विचार करून त्यानुसार सुवर्ण विधानसौध परिसरातील 3 कि.मी. परिसरात पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन आंदोलन मोर्चा किंवा सभा घेण्यास एखाद्या व्यक्तीचा अपमान होईल असे चित्र चिन्ह प्रतिकृती दाखविण्यास बंदी असणार आहे.
तसेच या परिसरात शस्त्र, दगड, काठ्या, स्फोटक पदार्थ, फटाके, पुतळे भावना भडकविणारे बॅनर व घोषणाबाजी करण्यास मनाई असणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून वाहतूक रोखण्यास देखील सक्त मनाई असेल.
स्फोटके किंवा आक्षेपार्ह वस्तू कोणाकडे आढळून आल्यास संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे. अधिवेशन काळात अधिवेशन काळात पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचा वापर करण्यावरही निर्बंध असणार आहे. तथापि विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक मिरवणुकींना मर्यादित सवलत असणार आहे.


