बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराने पुन्हा एकदा मानवता आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे. भाग्यनगर येथील शांताबाई नावाच्या एका हिंदू महिलेचे निधन झाल्यानंतर, त्यांच्यावर हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करून मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी माणुसकीचा एक नवा आदर्श घालून दिला.
शांताबाई या गेल्या २० वर्षांपासून गांधीनगर येथील एका मुस्लिम कुटुंबासोबत राहत होत्या. या कुटुंबाने त्यांना केवळ आश्रयच दिला नाही, तर अत्यंत सन्मानाने आणि प्रेमाने त्यांची काळजी घेतली. वृद्धापकाळ आणि दीर्घ आजारपणामुळे त्यांचे बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच इक्बाल जकाती यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून विजय मोरे यांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आणि मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधून सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत सन्मानाने नेण्याची व्यवस्था केली.

या वेळी एलन विजय मोरे, इक्बाल जकाती, निसार, शमशेर, संजय कोलकर आणि सदाशिव नगर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शांताबाई यांच्या पार्थिवावर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी करण्यात आले.
त्यानंतर सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बेळगावच्या मातीत असलेली बंधुभाव आणि परस्पर आदराची परंपरा या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.




