belgaum

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहराच्या कानाकोपऱ्यात पोलिसांचा कडक पहारा

0
568
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. मात्र या आनंदाच्या भरात मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांनी आता कडक नजर ठेवली आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये तरुणाईकडून होणारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि वाढते अपघात रोखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी कडक पावले उचलत पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांसाठी विशेष नाकाबंदी सुरू केली आहे.

राज्य पोलीस मुख्यालय आणि रस्ते सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. केवळ शुक्रवारीच रहदारी पोलिसांनी शहरात नशेत वाहन चालवणाऱ्या १५ जणांना पकडून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत आतापर्यंत एकूण ५७ मद्यपी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, शहरातील मुख्य रस्ते, क्लब्स आणि हॉटेल परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने प्रत्येक संशयास्पद चालकाची तपासणी केली जाणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अपघात होऊ नये, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

विशेषतः तरुणांनी सेलिब्रेशन करताना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मद्यप्राशन केल्यास टॅक्सी किंवा चालकाची मदत घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईसह वाहन जप्तीला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.