बेळगाव लाईव्ह: पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या बेळगाव येथील मुत्यानट्टी गावाची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. आज नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या हस्ते मुत्यानट्टी गावात ५ लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसह महत्त्वाकांक्षी २४ तास पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री भैरती सुरेश यांनी या समारंभात उत्तर बेळगावचे स्थानिक आमदार आसिफ सेठ यांच्या विकास कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. विशेष म्हणजे, त्यांनी बेळगाव शहर पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार विकासासाठी आपल्या विभागाकडून तब्बल १००० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची घोषणाही यावेळी केली.
के.यू.आय.डी.एफ.सी., महानगरपालिका बेळगाव आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने के.यू.डब्ल्यू.एस.एम.पी. मार्फत ही योजना साकारण्यात आली आहे. मंत्री भैरती सुरेश यांनी महापौर मंगेश पवार, आमदार आसिफ सेठ, उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेला हिरवा कंदील दाखवला.
यावेळी बोलताना मंत्री भैरती सुरेश यांनी स्पष्ट केले, “नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मुत्यानट्टी येथे २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. आमदार आसिफ सेठ हे अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांनी रस्ते आणि गटारांच्या कामासाठी बेळगाव महानगरपालिकेला सुमारे २०० कोटी रुपये दिले आहेत. माझ्या विभागाकडून पिण्याचे पाणी आणि भूमिगत गटार विकासासाठी बेळगावसाठी १००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी सांगितले की, या भागातील नागरिकांना पूर्वी मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. पण आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे सुविधा उपलब्ध होत आहेत. मंत्र्यांच्या प्रयत्नातून या गावात २४ तास पाणीपुरवठा योजना सुरू झाली असून, मंत्र्यांनी दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून दुसरी योजनाही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुत्यानट्टी येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी आमच्या गावात पाण्यासाठी मोठी ओरड होती, पण आमदार आसिफ सेठ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही ५ लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभी राहिली आणि २४ तास पाणीपुरवठा योजना सुरू झाली. यामुळे गावाची जुनी समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे.”
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.





