बेळगाव लाईव्ह : कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग तक्रार दाखल केल्यानंतर, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचे समर्थन केले आहे. सीमाप्रश्न आता संपलेला विषय असल्याचे बेताल वक्तव्य करत शेट्टर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूने पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेल्या शेट्टर यांनी मराठी भाषिकांविरोधातच भूमिका घेतल्याने सीमावासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कर्नाटक आणि बेळगावमधील परिस्थितीबाबत आपण लोकसभा अध्यक्षांना माहिती देणार असल्याचे शेट्टर यांनी म्हटले आहे. मात्र, जर खासदारांना खरोखरच माहिती द्यायची असेल, तर त्यांनी सीमाभागात मराठी भाषिकांचे हक्क कशा प्रकारे डावलले जात आहेत, त्यांना लोकशाही हक्कांपासून कसे वंचित ठेवले जात आहे
आणि त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार यावरही प्रकाश टाकावा, अशी मागणी मराठी भाषिक जनतेतून केली जात आहे. केवळ कर्नाटक सरकारची पाठराखण करण्यासाठी वस्तुस्थिती लपवू नये, असा इशाराही सीमावासियांनी दिला आहे.
सीमाप्रश्न हा पूर्णतः संपलेला विषय असून खासदार धैर्यशील माने यांनी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला अशी केविलवाणी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली आहे. शिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई कायदेशीर असून माने यांनी हा वाद उकरून काढल्याचा आरोप शेट्टर यांनी केला आहे.

मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या खासदाराच्या विरोधात शेट्टर यांनी घेतलेली ही भूमिका मराठी भाषिकांच्या विरोधातील असून खास. शेट्टर यांच्या या वक्तव्याचे मराठी भाषिकातून तीव्र पडसाद उमटत आहेत.
मराठी मतदारांनी पदरात टाकलेल्या मतांच्या जोरावर संसदेत पोहोचलेल्या जगदीश शेट्टर यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अन्यायकारक भूमिकेची ढाल बनण्याचे ठरवले आहे. बेळगावची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्यच असल्याचे सांगत त्यांनी जिल्हा प्रशासनाची पाठराखण केली आहे. ज्या मराठी जनतेच्या पाठिंब्यावर ते खासदार झाले, त्यांच्याच लोकप्रतिनिधीच्या विरोधात आणि त्यांच्या हक्कांच्या विरोधात पत्र लिहिण्याच्या शेट्टर यांच्या निर्णयामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.


