बेळगाव लाईव्ह : बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकारांचा गैरवापर करून आपल्याला जिल्ह्यात प्रवेश नाकारल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दाद मागितली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी बेळगावसह ८६५ गावे कर्नाटकात विलीन केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावमधील मराठी भाषिक जनता दरवर्षी काळा दिन पाळते. या दिवशी मराठी भाषिक काळे झेंडे दाखवून शांततापूर्ण मार्गाने आपला विरोध व्यक्त करतात. १ नोव्हेंबर २०२५ रोजी खासदार धैर्यशील माने हे सीमावाद कायदेविषयक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून बेळगावकडे जात होते. मात्र, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेकायदेशीर नोटीस जारी केली आणि त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी खासदार माने यांना सीमा भागावरच अडवले.

कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना आणि देशाचा लोकप्रतिनिधी असतानाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखणे, हा आपल्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.


