बेळगाव लाईव्ह— महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना बेळगाव जिल्ह्यात येण्यापासून रोखले जात असल्याच्या आरोपांवर ज्येष्ठ विधीतज्ञ पद्मश्री उज्वल निकम यांनी वक्तव्य केले आहे.
बेळगाव येथील एका शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी उज्वल निकम आज बेळगावात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटले, “जर महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना बेळगावला येण्यापासून रोखण्यात येत असेल, तर मला आज इथे येताना का अडविण्यात आले नाही?”
पत्रकारांनी त्यांना खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव प्रवेशास मज्जाव झाल्याबाबत संसदेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीची माहिती दिली. त्यानंतर उज्वल निकम यांनी या संपूर्ण विषयाकडे कायदेशीर दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सूचित केले.

निकम म्हणाले की, “महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावात येण्यास रोखण्यात येते, याची मला याआधी कल्पना नव्हती. जर अशी तक्रार अधिकृतपणे करण्यात आली असेल, तर त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की या विषयावर खासदार धैर्यशील माने यांच्याशी थेट चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत.
उज्वल निकम यांच्या या विधानामुळे बेळगाव प्रवेशासंदर्भातील निर्णय कोणत्या निकषांवर घेतले जातात, कायद्याच्या चौकटीत समान वागणूक दिली जाते का, आणि प्रशासकीय स्तरावर दुटप्पी भूमिका तर नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.




