बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राबाहेर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य करणारे बृहन महाराष्ट्र मंडळ यंदा आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या बेळगाव शाखेच्या वतीने बुधवार, दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता, कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर प्रस्तुत, गाजलेल्या ‘हे बंध रेशमाचे’ या संगीत नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
ही माहिती बृहन महाराष्ट्र मंडळाशी संलग्न असलेल्या मराठी भाषा प्रेमी मंडळाचे कार्यवाह नितीन कपिलेश्वर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना कपिलेश्वर म्हणाले की, मिलिंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या बृहन महाराष्ट्र महामंडळातर्फे शतकमहोत्सवानिमित्त देशभरातील विविध राज्यांतील शाखांमध्ये वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून बेळगावातही विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे.
शतकमहोत्सवाच्या निमित्ताने सिद्धहस्त लेखक रणजित देसाई लिखित आणि रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘हे बंध रेशमाचे’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. नाटकाच्या प्रारंभी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या 28 ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे यांच्यातर्फे सादर होणाऱ्या या नाटकात बेळगावची कलाकार अनुष्का आपटे अभिनय सादर करणार आहेत. या नाटकाचे विनामूल्य पासेस टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य मंदिर तसेच लोकमान्य रंगमंदिरात रसिकांसाठी उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.
शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुढील काळातही बेळगाव शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कपिलेश्वर यांनी दिली.पत्रकार परिषदेला कुमार पाटील, परशुराम माळी, नीता कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.





