बेळगाव लाईव्ह : सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडक एकांकिका नाट्यस्पर्धा बेळगावात दोन दिवस रंगणार आहे. कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही शनिवारी व रविवारी नाट्यरसिकांना नाट्यपर्वणी अनुभवता येणार आहे.
या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुभवी व मातब्बर परीक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमोद काळे (पुणे), सुनील खानोलकर (मुंबई) आणि वामन मधुसूदन पंडित (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. त्यांच्या संक्षिप्त परिचय पुढीलप्रमाणे :
प्रमोद काळे – पुणे
गेली ४५ वर्षे रंगभूमीशी लेखक, दिग्दर्शक व प्रशिक्षक म्हणून कार्यरत.
२५ एकांकिका व ७ नाटकांचे लेखन व दिग्दर्शन.
महाराष्ट्रीय कलोपासक, जागर संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी गेली ३० वर्षे संबंधित; सध्या उपाध्यक्ष.
अनेक लेखन व दिग्दर्शन पारितोषिकांचे मानकरी.
‘अपूर्णात अपूर्णम्’ या नाटकाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लेखन पुरस्कार, तसेच प्रायोगिक नाटकासाठी महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार.
नाट्य कार्यशाळांचे आयोजन, अतिथी दिग्दर्शक म्हणून कार्य.
सुमित्रा भावे व सई परांजपे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातही योगदान.
वामन मधुसूदन पंडित – सिंधुदुर्ग
रंगभूमीविषयक अनेक पुस्तकांची निर्मिती.
‘रंगवाचा’ हे नाट्यविषयक त्रैमासिक चालवत असून त्यास उत्कृष्ट अंकांचे पुरस्कार मिळाले आहेत.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवलीचे अध्यक्ष.
एकांकिका स्पर्धा, नाट्यमहोत्सव, संगीत त्रिसूत्री कार्यक्रम, अभिवाचन, संहिता संग्रह, नाटकघर योजना असे विविध उपक्रम.
साहित्यिकांच्या लेखनावर आधारित अभिवाचन कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन व सहभाग.

सुनील मोहन खानोलकर – मुंबई
‘खोटं-खोटं’, ‘अडथळा’, ‘हॅपी बर्थडे’, ‘सख्या धावाधाव’, ‘आता माघार नाही’, ‘वारसदार’ या नाटकांचे लेखक.
अनेक हिंदी मालिकांचे संवाद व पटकथा लेखन.
मराठी मालिका ‘डायल १००’, ‘पंचनामा’, ‘क्राईम डायरी’ यांचे लेखन व दिग्दर्शन.
‘हॅपी बर्थडे’ नाटकाला नाट्यगौरव पुरस्कार, तर ‘क्राईम डायरी’ मालिकेला उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार.
गेली २५ वर्षे एकांकिका व नाटकांचे परीक्षक म्हणून कार्यरत.
ही स्पर्धा बेळगावातील नाट्यचळवळीला चालना देणारी ठरणार असून, नाट्यरसिकांसाठी ती पर्वणी ठरणार आहे.


