बेळगाव. लाईव्ह : कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघातर्फे आयोजित 20 वे मराठी साहित्य संमेलन आज रविवारी कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली मराठीचा जागर करत उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठ्या उत्साहात पार पडले.
कुद्रेमानी हायस्कूल क्रीडांगणावर कै. परशराम मि. गुरव साहित्य नगरीत आयोजित या संमेलनाची सुरुवात आज सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने झाली. याप्रसंगी प्रारंभी रवळनाथ दूध संघाचे लक्ष्मण पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते संपत्ती श्री विठ्ठल रखुमाई पूजन झाल्यानंतर पायी दिंडी सोहळा माजी अध्यक्ष निंगाप्पा पाटील व अर्जुन राजगोळकर यांनी सपत्नीक पालखी पूजन केले त्याचप्रमाणे रवळनाथ जांबोटकर व अशोक सुतार यांनी ग्रंथ पूजन केल्यानंतर परसराम शिंदे आणि प्रकाश गुरव यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
गावातील प्रमुख मार्गांवरून संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या या सवाद्य ग्रंथादिंडीमध्ये संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, उद्घाटक माजी जि. पं. सदस्या सरस्वती रामचंद्र पाटील, सौंदर्य पेंट्स बेळगावचे आर. आय. पाटील, करवीरवासीय हास्य सम्राट नितीन कुलकर्णी, सांगलीचे लोककलाकार संपत कदम, बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश विलास गुरव, उपाध्यक्ष लखन धामणेकर, महेश पाटील, सचिव एम. बी. गुरव आदींसह साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते. हातात मराठीचा जागर करणारे फलक घेऊन मराठमोळ्या वेशभूषेतील शाळकरी मुला-मुलींचा ग्रंथदिंडीतील सहभाग साऱ्यांचे लक्ष वेधणारा होता. ग्रंथदिंडी दरम्यान गावातील अश्वारूढ शिव पुतळ्याचे पूजन प्रशांत पाटील व मल्लाप्पा जांबोटकर यांच्या हस्ते झाले.
ग्रंथदिंडीचे संमेलन स्थळी आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेशद्वाराचे उद्घाटन सतबा लोहार व तुकाराम बडसकर यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे कै. परशराम मि. गुरव साहित्य नगरीचे उद्घाटन विक्रम आपुणी चौगुले यांच्या हस्ते झाले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन भैरू आनंदाचे यांनी केल्यानंतर विष्णू जांबोटकर व डॉ व्ही. जी. बडसकर यांनी कै. परशराम मि. गुरव स्मारकाचे पूजन केले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, धर्मवीर संभाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पूजनाचा हा कार्यक्रम अनुक्रमे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, एम. पी. गुरव, सदानंद धामणेकर, डॉ. एन. एम. गुरव, डॉ. विजय कट्टीमनी, डॉ. एल. एन. हुलजी, मनोहर बेळगावकर, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. विजय पाटील व डॉ. व्ही. एम. सातेरी यांच्या हस्ते झाला. बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश विलास गुरव यांनी प्रास्ताविक केल्यानंतर संजय गोपाळ पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी जि. पं. सदस्या सरस्वती रामचंद्र पाटील आणि सौंदर्य पेंट्स बेळगावचे आर. आय. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त करून संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन समारंभानंतर पहिल्या सत्रातील अध्यक्षीय भाषणात प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. संमेलना अध्यक्षांनी नुसतं आला बोलला आणि गेला, असे न करता सतत कार्यरत राहिला पाहिजे. मी स्वतः विद्यार्थी दशेपासून साहित्यातला कार्यकर्ता म्हणून धडपडत असतो. चांगली लिखाण करणारी मुले शोधत असतो बऱ्यापैकी लिहिणारी मुले शोधत असतो, लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो हे सगळं खरं असल तरी ते आपले कामच आहे. तथापि ते मला माझ्या डोळ्यासमोर सिद्ध करायचे आहे. बोलणारा वाचत जावा लिहिणारा लिहीत जावा म्हणजे बोलणं आणि लिहिणं यातून संवाद वाढेल चर्चा होईल सकारात्मक आणि नकारात्मक चर्चेतून काही नवे निर्माण होईल इतकंच काय नवनिर्मितीची बीजं चर्चेतून जन्माला येतील, असे प्रा. डॉ. पोतदार म्हणाले.
दुसऱ्या सत्रात कोल्हापूरचे हास्य सम्राट नितीन कुलकर्णी यांचा ‘चला हसुया थोडे’ हा विनोदी कार्यक्रम झाला. दुपारच्या स्नेहभोजनानंतर सत्कार सोहळा पार पडला अखेरच्या तिसऱ्या सत्रात सांगलीचे लोककलाकार संपत कदम व त्यांच्या सहकार्याने ‘भूपाळी ते भैरवी’ हा मराठमोळा रांगडा कार्यक्रम सादर केला. संमेलनाला कुद्रेमानी पंचक्रोशी तसेच बेळगाव, खानापूरसह विविध ठिकाणचे साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




