बेळगाव लाईव्ह : मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे 31 आठवड्यांच्या कठोर आणि शिस्तबद्ध लष्करी प्रशिक्षणाची सांगता करत सहाव्या अग्निवीर तुकडीचा शपथविधी समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. एकूण 484 अग्निवीरांनी यावेळी शपथ घेतली.
समारंभाचे परीक्षण मेजर जनरल हरी भास्करण पिल्लै, एडीजी रिक्रूटिंग (स्टेट्स) यांनी केले. त्यांनी परेडदरम्यान अग्निवीरांनी दाखवलेल्या उत्कृष्ट शिस्त, उत्तुंग जोश आणि निर्दोष ड्रिलचे कौतुक केले.
अग्निवीरांनी राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र ग्रंथांच्या साक्षीने शपथ घेतली. या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून अग्निवीरांचे पालक, माजी सैनिक, मान्यवर, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अग्निवीर पवन यल्लाकुरी यांनी परेडचे नेतृत्व केले.
समारंभात विजेत्या अग्निवीरांना पारितोषिके वितरित करण्यात आली. यामध्ये अग्निवीर सूरज मोरे याला ‘सर्वोत्कृष्ट अग्निवीर’ म्हणून नाईक यशवंत घाडगे, व्हीसी पदक प्रदान करण्यात आले.
शपथविधी समारंभानंतर शरकात वॉर मेमोरियल येथे वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अग्निवीरांच्या पालकांना गौरव पदक देऊन मराठा रेजिमेंट सेंटरतर्फे सन्मानित करण्यात आले.
मराठा रेजिमेंट सेंटरमधील हा भव्य समारंभ अग्निवीरांच्या नव्या प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात ठरला.

यावेळी बोलताना मेजर जनरल हरी भास्करण पिल्ले म्हणाले की, “आजचा दिवस भारतीय सेनेसाठी अभिमानाचा आहे. देशभरातून निवडलेल्या अग्निवीरांनी राष्ट्राची सुरक्षा, एकता आणि अखंडता जपण्याची शपथ घेतली आहे. लाखो तरुणांमधून निवड झाल्यामुळे तुमच्यातील क्षमता आणि गुण सिद्ध होतात.”
गत सात महिन्यांत अग्निवीरांनी केलेले प्रशिक्षण उच्च दर्जाचे असल्याचे सांगताना त्यांनी ड्रोन वॉरफेअरच्या नव्या युगाकडेही लक्ष वेधले. अग्निवीर बॅच 6/25 मधील सुमारे ६० टक्के जवानांना अॅडव्हान्स ड्रोन ट्रेनिंग देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“तुम्ही आता रेजिमेंटचे आणि भारतीय सेनेचे कायमचे सदस्य झाला आहात. पुढील काही दिवसांत तुम्ही आपल्या युनिटमध्ये रुजू होणार असून तुमचे भविष्य सैन्यात किंवा सैन्याबाहेरही उज्ज्वल राहील,” असा विश्वासही कमांडंट यांनी व्यक्त केला.
शेवटी, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा त्यांनी सत्कार केला आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही अभिनंदन करत भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



