बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी हिवाळी अधिवेशनामुळे बेळगावातील सुवर्णसौध इमारत सध्या विद्युत रोषणाईने झगमगून निघाली आहे.
सुवर्णसौधच्या भव्यतेला साजेशी केलेली ही रोषणाई उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः संध्याकाळनंतर ही इमारत रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघत असल्याने, या परिसराला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा भाग म्हणून सुवर्णसौध इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सुवर्णसौध इमारतीवर लावलेल्या विशिष्ट विद्युत माळांमुळे रात्रीच्या वेळी हे ठिकाण प्रकाशमय झाले आहे.
केवळ इमारतच नव्हे, तर परिसरातील रस्ते आणि उद्यानेही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत. यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावात आलेले मान्यवर, गरिक तसेच स्थानिक रहिवासी ही नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सुवर्णसौधच्या आत राज्याच्या विविध समस्यांवर गंभीर चर्चा सुरू असली तरी, बाहेरील परिसर मात्र या रोषणाईमुळे एका उत्सवाचे स्वरूप धारण करत आहे. ही रोषणाई अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहणार असून, बेळगावकरांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे.


