बेळगाव लाईव्ह :सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकार कसे गदा आणते याची जाणीव करून देणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिणार असून केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावर हस्तक्षेप करावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली आहे.
सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा पुतळा जाळणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. खासदार माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्यामुळे खवळलेल्या कन्नड संघटनांनी हे कृत्य केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात वारंवार प्रवेशबंदी करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या घटनात्मक अधिकारांचे हे उल्लंघन असल्याचे सांगत, खासदार माने यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरोधात ‘हक्कभंग’ तक्रार दाखल केली आहे. या पावलामुळे कन्नड संघटनांचा तिळपापड झाला असून त्यांनी माने यांचा पुतळा जाळून निषेध केला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले की, “गेल्या ७० वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मूलभूत हक्कांवर कर्नाटक सरकार गदा आणत आहे. खासदार माने यांना बेकायदेशीररीत्या जिल्ह्यात येण्यापासून रोखले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून सीमाभागातील २५ लाख मराठी भाषिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.”

शुभम शेळके यांनी महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणावरही ताशेरे ओढले. “महाराष्ट्र सरकारने आता तरी जागे व्हावे. राज्य सरकारची हीच उदासीनता सीमावासियांना महागात पडत आहे. केवळ लोकसभा अध्यक्षच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्र्यांनाही येथील परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी युवा समितीच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





