बेळगाव लाईव्ह :ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस गुंतवणूक घोटाळ्यातील एका आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेळगाव बसस्थानकावर अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव सोमनाथ मधुसूदन कोळी असे आहे. ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस गुंतवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर गेल्या ऑक्टोबर 2022 पासून सोमनाथ कोळी फरारी होता.
तो बेंगलोरहून बेळगावला प्रवास करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सापळा रचला.
त्याद्वारे त्याला बेळगाव बसस्थानकावर अटक करण्यात आली. ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस गुंतवणूक घोटाळ्यातील 9 आरोपींपैकी कोळी हा एक आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांनी 259 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
सदर कंपनीने 10 महिन्यांत 15 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरचा रहिवासी असलेला कोळी गुन्हा दाखल झाल्यापासून लपून बसला होता आणि किरकोळ कामे करून गुजराण करत होता.




