बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील नागुर्डा, मोदेकोप, काटगाळी व गणेबैल परिसरात गविरेडा व त्याच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तसेच ऊस तोडप्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गविरेडा व कळपाकडून भात व ऊस पिके तुडवली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
नागुर्डा परिसरात सध्या एक गविरेडा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. हा गविरेडा रात्रीप्रमाणेच दिवसा देखील निर्भयपणे शेतशिवारात वावरत असून, ऊसाच्या शेतात बसणे, दीर्घकाळ तिथेच थांबणे असे प्रकार करत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून पाठविण्यात आलेल्या ऊस तोडप्यांनाही ऊस तोडण्यास भीती वाटत आहे.
दरम्यान, हा गविरेडा चालताना तोल जाऊन झाडाला आदळणे, चालता-चालता पडणे असे प्रकार करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो आजारी असावा किंवा त्याला दृष्टीदोष (आंधळेपणा) झालेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी जळगे येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्तीला बेशुद्ध करून पकडून शिमोगा येथील जंगलात सोडले होते. त्याच धर्तीवर सदर गविरेडा व त्याच्या कळपाला बेशुद्ध करून पकडून एखाद्या घनदाट अरण्यात सोडण्याची मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यासाठी वन खात्याने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्वरित लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





