बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील जळगा गावाजवळ मलप्रभा नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये उभ्या असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १,००० ते १,२०० टन ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी घडली. या आगीत शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या परिसरातील वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरजवळ शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडली. सुकलेल्या उसाच्या पानांना लगेचच आग लागली आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता मोठ्या क्षेत्रातील ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, मात्र शेतातील जमीन ओली व चिखलयुक्त असल्याने अग्निशामक वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणता आली नाही.

परिणामी मोठ्या प्रमाणावर ऊस पीक पूर्णतः जळून खाक झाले.
या आगीत अनेक शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन नष्ट झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. ऊस शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर या घटनेचा मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




