belgaum

क्रिकेटच्या दृष्टिकोनातून बेळगावचा लवकरच सर्वांगीण विकास – व्यंकटेश प्रसाद

0
555
 belgaum

बेळगाव लाईव्ह:राज्याच्या क्रिकेट क्षेत्रात हवा असलेला सकारात्मक बदल आता झालेला आहे. राज्यातील क्रिकेटला आणखी भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न असणार आहेत. आम्ही येथे आलो आहोत ते क्रिकेटच्या उत्कर्षासाठी क्रिकेट मधील राजकारणासाठी नाही. यापुढे क्रिकेटच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या बेळगावसह क्रिकेटशी संबंधित सर्व केंद्रांचा लवकरात लवकर सर्वांगीण विकास साधला जाईल, असे आश्वासन कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) नूतन अध्यक्ष भारताचे माजी ख्यातनाम वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी दिले.

कणबर्गी, बेळगाव येथील केएससीएच्या स्टेडियममध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. व्यंकटेश प्रसाद म्हणाले की बेळगावला मी यापूर्वी देखील येऊन गेलो आहे. तथापि या केएससीएच्या क्रिकेट स्टेडियम मी पहिल्यांदाच भेट देत आहे. बेळगावला आल्यानंतर आज आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उभयतांच्या भेटीप्रसंगी आमची चांगली सकारात्मक चर्चा झाली. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) आयपीएल 2025 च्या विजयोत्सवाप्रसंगी जी दुर्दैवी घटना घडली ती अतिशय चुकीची दुर्दैवी होती असे मंत्री महोदयांनी देखील मान्य केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर आजतागायत इतके क्रिकेटचे सामने झाले, समारंभ, सोहळे झाले, मात्र अशी दुर्घटना कधी घडली नव्हती. त्या दुर्घटनेला अनेक जण अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्याबद्दल मी आता अधिक बोलू इच्छित नाही.

त्या दुर्घटनेतील मृतांना आम्ही मनःपूर्वक श्रद्धांजली वाहतो. जे घडले ते अत्यंत वाईट होते, मात्र क्रिकेटला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. चिन्नास्वामी स्टेडियम हे एक ऐतिहासिक स्टेडियम असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील सातत्याने आमच्याशी संपर्क साधत आहे. लवकरात लवकर चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेचे प्रकरण संपुष्टात आणण्याचे आणि त्यासाठी आवश्यक सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्या दुर्घटनेनंतर सदर स्टेडियमवर महिलांचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना, तसेच अन्य महत्त्वाचे क्रिकेट सामने होऊ शकले नाहीत. त्यामुळे जे कांही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला द्विपक्षीय क्रिकेट मालिकाचे सामने आयोजित करण्याच्या स्वरूपात देऊ. एवढेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेचे शुभारंभाचे सामने आयोजित करण्याची संधी तुम्हाला देऊ, असे ठोस आश्वासन बीसीसीआयने आम्हाला दिले आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

 belgaum

एकंदर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेसह क्रिकेटच्या सर्व हितचिंतकांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या क्रिकेट क्षेत्रात हवा असलेला सकारात्मक बदल आता झालेला आहे. नुकतीच तीन दिवसांपूर्वी आमची कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेची निवडणूक पार पडली. गेल्या रविवारी रात्री निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आमच्या नव्या कार्यकारिणीने देवपूजा करून कामाला सुरुवात केली आहे. आजची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झालेली भेट पाहता देवदेखील आम्हाला चांगल्या योग्य मार्गाने नेत आहे असे वाटते. त्याखेरीज बेळगावच्या केएससीए स्टेडियमचा प्रकल्प पाहून अतिशय समाधान वाटते. येथील मैदान देखील उत्तम असले तरी स्टेडियमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.

गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते, हीच समस्या सर्वत्र आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी माझे सहकारी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनी जी सुधारणा केली होती ती पूर्णपणे मातीमोल झाल्याचे दिसून येते. तथापि आता आम्ही सर्व कांही पुन्हा ठीकठाक करणार आहोत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी म्हणून अधिकार ग्रहण केल्यानंतर तीन दिवसात आम्ही येथे बेळगावमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित अन्य मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आज आम्ही बेळगाव येथील स्टेडियमला भेट दिली असून यानंतर हुबळी येथील स्टेडियमला भेट देणार आहोत.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की राज्यातील क्रिकेटला आणखी भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न असणार आहेत. आम्ही येथे आलो आहोत ते क्रिकेटच्या उत्कर्षासाठी क्रिकेट मधील राजकारणासाठी नाही. यापुढे क्रिकेटच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या फक्त बेळगावच नाही तर शिमोगा तुमकुर हुबळी वगैरे केंद्रांचा विकास व्हावा यासाठी सातत्याने तेथे क्रिकेटचे दर्जेदार सामने खेळविले जातील. थोडक्यात बेळगावसह क्रिकेटशी संबंधित सर्व केंद्रांचा लवकरात लवकर सर्वांगीण विकास साधला जाईल, असे आश्वासन केसीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी दिले.

पत्रकार परिषदेच्या प्रारंभी बेळगावातील क्रिकेटचे संवर्धक आणि केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांनी बेळगावातील क्रिकेटच्या जुन्या आठवणींना विशेष करून 1996 च्या विश्वचषक स्पर्धेतील व्यंकटेश प्रसाद यांच्या खेळाच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सुजीत सोमसुंदर, सचिव संतोष मेनन्नावर, विनय मृत्युंजय आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.