बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या तथाकथित ‘काळा दिवस’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्यावर लादण्यात आलेली प्रवेशबंदी ही योग्य व आवश्यक होती, असा ठाम दावा बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रियाशील समितीने केला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतलेल्या निर्णयाला सीमाभागातील सर्व कन्नड संघटनांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रियाशील समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले असून, खासदार धैर्यशील माने यांनी केलेली तक्रार ही पूर्णतः तर्कहीन व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, धैर्यशील माने हे महाराष्ट्र सरकारच्या सीमावाद तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून, 1 नोव्हेंबर रोजी ते बेळगावात येऊन मराठी समाजाला सीमा व भाषेच्या नावाखाली चिथावणी देतील, अशी दाट शक्यता होती. यापूर्वीही अशा प्रसंगी भडक भाषणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित परिस्थिती टाळण्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशावर निर्बंध घातले होते.
अशोक चंदरगी यांनी आरोप केला आहे की, माने यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करताना ही वस्तुस्थिती लपवली असून, उलट आपल्या खासदारकीच्या पदाचा गैरवापर करून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “हे कृत्य लोकशाही मूल्यांना धरून नाही,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कन्नड संघटनांनी स्पष्ट केले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक होता आणि भविष्यातही अशा निर्णयांच्या पाठीशी कन्नड संघटना ठामपणे उभ्या राहतील.


