बेळगाव लाइव्ह : रुंदीकरणाला होणाऱ्या विरोधामुळे कंग्राळी ते शाहूनगर या अत्यंत महत्त्वाच्या संपर्क रस्त्याची दुरावस्था झाली असून गावकऱ्यांसह वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः लग्नकार्य किंवा सार्वजनिक कार्यक्रमांप्रसंगी या रस्त्यावर तब्बल तास–दीड तास वाहनांची कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सदर रस्त्याच्या कामासाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुमारे 4.5 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. बुडाकडून या रस्त्याचे 80 फूट रुंदीकरण करण्यास संमती मिळाली असली तरी ग्रामपंचायत येणे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी हा रस्ता साठ फुटाचा करण्याचा निर्णय घेतला असून तसा ठराव ही मंजूर झाला आहे.
याखेरीज ठेकेदाराने आवश्यक बांधकाम साहित्य घेऊन प्रत्यक्ष ठिकाणी हजेरीही लावली आहे. मात्र, कांही लोकांच्या विरोधामुळे काम सुरू होण्यात अडथळे येत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या विलंबाला नेमके कोण जबाबदार? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायत, अध्यक्ष व सदस्य, संबंधित वरिष्ठ अधिकारी की अन्य प्रशासकीय यंत्रणा? जबाबदारी निश्चित कोणाची? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे 28 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता सुरक्षित व सुरळीत न झाल्यास कंग्राळी गावात येणाऱ्या हजारो भाविक व पाहुण्यांचे हाल अटळ आहेत.
त्यामुळे गावाची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर रस्ता वेळेत झाला नाही, तर याची जबाबदारी कोण घेणार? तेंव्हा प्रशासनाने पंचायत स्तरावरून तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी कंग्राळी ग्रामस्थांसह कंग्राळी ते शाहूनगर रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालकांकडून होत आहे.




