काकती पोलिसांनी एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये किमतीची 10 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मुजीफ मंजूर अहमद शेख (वय 21, रा. विष्णू गल्ली, वडगाव बेळगाव) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की काकती येथील अब्दुलरशीद इमासाब डोणकर यांनी गेल्या 21 डिसेंबर 2025 रोजी आपली सुझुकी एक्नस दुचाकी (क्र. केए 22 एच आर 8843) चोरीला गेल्याची तक्रार काकती पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
याप्रकरणी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर बी. एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास कार्य हाती घेऊन मुजीफ शेख याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत मुजीफ याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील डोणकर यांच्या चोरीला गेलेल्या दुचाकीसह अन्य 9 दुचाकी वाहने जप्त केली. मुजीफ याने एकंदर ही 10 वाहने काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3, माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, मारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 आणि अन्य एका ठिकाणाहून 1 अशी चोरली होती.
जप्त केलेल्या या वाहनांमध्ये 6 हिरो होंडा स्प्लेंडर आणि 4 सुझुकी एक्नस दुचाकींचा समावेश असून ज्यांची किंमत एकूण 7,00,000 रुपये इतकी होते. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. उपरोक्त कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी काकतीचे पोलीस निरीक्षक गंगाधर बी. एम. यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाला शाबासकी दिली आहे.




