बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीवर भाजप राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी भेट घेऊन कारवाई न करण्याची विनंती केली आहे.
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी यांनी आज नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देत जिल्हाधिकाऱ्यांकडून खासदारांच्या विशेषाधिकारांचा कोणताही भंग झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात खासदार ईरन्ना कडाडी यांनी नमूद केले की, बेळगाव जिल्हा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेलगत आहे. येथे कन्नडसह विविध भाषिक समुदायातील नागरिक परस्पर सलोख्याने आणि बंधुभावाने शांततेत वास्तव्यास आहेत. मात्र, काही संघटना दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी ‘कर्नाटक राज्योत्सव’ तसेच बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी विशेष विधानसभा अधिवेशनाच्या काळात ‘काळा दिवस’ पाळत राज्य सरकारविरोधात आंदोलन करतात.
या आंदोलनांच्या काळात शेजारील राज्यांतून काही नेते येऊन भडक भाषणे देतात. त्यामुळे परिसरात अनावश्यक तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व भाषिक समुदायांच्या सुरक्षिततेची आणि हितसंबंधांची जपणूक करणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर ‘काळा दिवस’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावात येत असलेल्या खासदार धैर्यशील माने यांच्या प्रवेशावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले होते. ही कारवाई खासदारांच्या विशेषाधिकारांचा भंग करणारी नसून, जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेले वैधानिक पाऊल असल्याचे खासदार कडाडी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला खासदारांच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन ठरवून त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करणे हे अन्यायकारक व अतार्किक असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश पूर्णतः संविधानिक असून कायद्याच्या चौकटीत असल्याची माहिती त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली.

या मुद्द्यांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही. घटनेची पार्श्वभूमी व परिस्थिती यांची सखोल चौकशी केली जाईल. तसेच कर्नाटक राज्यातील जनतेने कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ही माहिती राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




