बेळगाव लाईव्ह : तांत्रिक व कार्यात्मक अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सची देशभरातील प्रमुख महानगरांची सुमारे 1000 हून अधिक विमान उड्डाणे रद्द होण्याबरोबरच अनेक उड्डाणे प्रलंबित राहिल्यामुळे काल गुरुवारपासून लाखो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांच्यावर देशाच्या विविध भागात अडकून पडण्याची वेळ आली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानुसार (डीजीसीए) पुनरावलोकन कालावधीत इंडिगोची 1,232 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द होणाऱ्या या उड्डाणांपैकी बहुतेक उड्डाणे नवीन एफडीटीएल (उड्डाण कर्तव्य वेळ मर्यादा) नियमांबाबतच्या तक्रारींसह विमान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेशी संबंधित आहेत.
तसेच इंडिगोने विमानतळावरील हवाई जागा आणि एटीसी अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण संबंधित समस्या त्यांच्या थेट नियंत्रणाबाहेर असल्याचे देखील नमूद केले आहे. वैमानिकांच्या (पायलट) कमतरतेसाठी पायलट असोसिएशन (एएलपीए) नवीन एफडीटीएल नियमांना दोष देत आहे.
नवीन एफटीपीएल नियम कठोर विश्रांतीचे तास लागू करतात आणि रात्रीच्या विमान फेऱ्या (ऑपरेशन्स) कमी करत असल्यामुळे त्याचा मोठा फटका इंडिगोला बसला आहे.
दरम्यान डीजीसीएने उड्डाणे रद्द, प्रलंबित होण्याच्या व्यत्ययाची तीव्रता कमी करणाऱ्या योजनांची मागणी केली असून ते इंडिगोच्या ऑपरेशनल त्रुटींची चौकशी करत आहे. त्यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्सही बजावली आहे. दुसरीकडे तज्ञांनी चालू व्यत्यय नवीन नियमांमागील सुरक्षिततेच्या हेतूला धोका पोहोचवू शकतात, असा इशारा दिला आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या समस्येचा फटका बेळगाव विमानतळाला देखील बसला. नवी दिल्ली विमानतळावरील इंडिगोची सुमारे 30 उड्डाणे आज गुरुवारी सकाळी रद्द करण्यात आली, तर कांही प्रलंबित ठेवण्यात आली.
त्यामुळे आज सकाळी 5:50 वाजता सुटणाऱ्या दिल्ली -बेळगाव इंडिगो विमानास विलंब झाला. परिणामी बेळगाव विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.



