राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत चमकल्या बेळगावच्या हलकारे भगिनी

0
271
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या आघाडीच्या होतकरू जलतरणपटू कु. सुनिधी सुहास हलकारे आणि कु. समृद्धी सुहास हलकारे या भगिनींनी नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा महोत्सवातील विविध जलतरण स्पर्धांमध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 5 पदके जिंकून बेळगावसाठी अभिमानास्पद अशी शानदार कामगिरी केली आहे. तसेच सदर राष्ट्रीय स्पर्धेत यंदा सलग तिसऱ्या वर्षी पदकं जिंकून हलकारे भगिनींनी हॅट्ट्रिक साधली आहे.

नवी दिल्ली येथे गेल्या 12 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत 69 वा राष्ट्रीय शालेय क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. या क्रीडा महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे जलतरणाच्या 200 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत हलकारे भगिनींनी वर्चस्व गाजवत आपली अपवादात्मक प्रतिभा आणि दृढनिश्चय दाखवून दिला. समृद्धी हलकारे हिने मुलींच्या 17 वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले, तर सुनिधी हलकारे हिने 19 वर्षांखालील गटात रौप्य पदक पटकावले. एकाच स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात दोन बहिणींनी पदक मिळवून पोडियमवर स्थान मिळवण्याचा हा एक अभिमानास्पद क्षण होता.

ही उत्कृष्ट कामगिरी म्हणजे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी पदकं जिंकण्याची त्यांची हॅट्ट्रिक असून जी त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी, शिस्त आणि भारतीय जलतरण क्षेत्रातील वाढते स्थान अधोरेखित करते. क्या खेरीज त्यांच्या वाढत्या यशोशिखरात आणखी एक मानाचा तुरा रोवते. या पद्धतीने सुनिधी व समृद्धी यांनी आपले आई -वडील सुहास हलकारे आणि सुषमा हलकारे यांच्यासह समस्त हलकारे घराण्याचा आणि बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.

 belgaum

हलकारे या बहिणींनी यापूर्वी बिहारमधील गया येथे आयोजित खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 च्या सातव्या आवृत्तीत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या अथक परिश्रम, स्पर्धात्मक वृत्ती आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाने, सुनिधी आणि समृद्धी हलकारे राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत असून देशभरातील उदयोन्मुख जलतरणपटूंना प्रेरणा देत आहेत.

त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचेच नव्हे, तर भारतीय जलतरणाच्या उज्ज्वल भविष्याचेही प्रतीक आहे. सुनिधी व समृद्धी या दोघी ऑलिम्पिक आकाराच्या केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांच्या देखरेखीखाली बेळगावच्या स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस स्विम क्लबमध्ये प्रशिक्षण घेतात.

या खेरीज त्या ओमकार मोटार आणि मोनिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ओम्स फिटनेसमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे धडे घेतात. त्यांची आरोग्य देखरेख आणि दुखापत प्रतिबंधनाचे काम डॉ. बसवराज मोतीमठ यांच्या नेतृत्वाखाली चालते. हलकारे भगिनींपैकी सुनिधी ही सध्या रवींद्रनाथ टागोर पी.यू. कॉलेजमध्ये शिकत आहे. तिला प्राचार्य डॉ. सी. एन. नाईकर यांनी नेहमीच प्रोत्साहन आणि सर्वतोपरी पाठिंबा दिला आहे.

तिची बहीण समृद्धी ही ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई शाळेत शिकत आहे. शाळेच्या प्राचार्या श्रीमती मंजिरी रानडे आणि प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग तिला मार्गदर्शन करून पाठिंबा देत असतात. याव्यतिरिक्त रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि आदींचे त्यांना सातत्याने प्रोत्साहन लाभत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.