बेळगाव लाईव्ह: शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ‘ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट’ला ५० वर्षे पूर्ण झाली असून संस्थेचा सुवर्ण महोत्सव 26 व 27 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.”अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास जी. अणवेकर यांनी पत्रकारांना दिली.
सुवर्ण महोत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. नविना आर. शेट्टीगार , मानद अध्यक्ष प्राचार्य व्ही एन जोशी, उपाध्यक्ष सुधाकर देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि कार्यक्रमांची माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की,” शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. ‘साईराज लॉन्स’ मंडोळी रोड, बेळगाव येथे
होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे
खासदार आणि प्रख्यात कायदेतज्ञ पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार असून मुख्य वक्ते म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराजा हे उपस्थित राहतील.यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ हे येणार आहेत.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष व्ही एन जोशी यांनी सांगितले की ” समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास जी. अणवेकर हे राहणार आहेत.शुक्रवारी दुपारच्या सत्रात ३:३० वा “गोल्डन रिदम्स” हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.

याप्रसंगी माजी आमदार संजय पाटील व एन डब्ल्यू के आर टी सी चे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नावर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डी डी पी आय लीलावती हिरेमठ या अध्यक्षस्थानी राहतील” या सत्रात संस्थेच्या माजी शिक्षकांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर विद्यार्थी वर्गाचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतील.
शनिवार, २७ डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील ‘जी.जी. चिटणीस स्कूल’च्या आवारात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये संवाद आणि स्नेहसंमेलन होईल.कार्यक्रमाची सांगता एका भव्य संगीत मैफिलीने होईल.
१९७४ मध्ये एका छोट्या बालवाडीपासून सुरू झालेला हा ट्रस्ट आज जेएसएस टायनी रॉकेट्स, जी जी चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सुवर्ण महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी अशा शैक्षणिक साम्राज्यात रूपांतरित झाला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांना केले आहे.




