बेळगाव लाईव्ह : घटप्रभा उजव्या तीराच्या मुख्य कालव्याद्वारे एकूण १,३५,३८१ हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा पुरवली जात आहे. या उजव्या तीराच्या कालव्याची दुरुस्ती आणि चिक्कोडी शाखा कालव्याच्या आधुनिकीकरणासाठी ₹ १,७२२ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली.
बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बिळगीचे आमदार जी.टी. पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय जल आयोगाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, हा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. मान्यता मिळाल्यास केंद्र आणि राज्य सरकार ६०:४० या प्रमाणात प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. मान्यतेच्या संदर्भात आपण केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
स्थानिक आमदार आणि खासदारांनी केंद्र सरकारवर दबाव आणून या कामाला लवकरात लवकर मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होईल. घटप्रभा डाव्या तीराच्या मुख्य कालव्याचे दुरुस्ती कार्य पूर्ण झाले आहे. या कालव्यामुळे एकूण १,६१,२५८ हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा पुरवण्यात आली आहे. या कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यात कोणतीही अडचण नाही, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले.
कालव्यातून शेतकऱ्यांना पंपसेटद्वारे शेतात पाणी घेण्याची परवानगी नाही. सरकारने कर्नाटक सिंचन अधिनियम २०२४ लागू केला असून, स्थानिक पोलिसांमार्फत अनधिकृत पंपसेट हटवण्यासाठी टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिले.





