बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला सांता क्लॉजची लाल टोपी घालून अवमान केल्याप्रकरणी कृत्य करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील हिंडलगा रोडवरील गांधी चौक येथे असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला काही विघ्नसंतोषींनी सांता क्लॉजची लाल टोपी घालून अवमान केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपित्याचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कॅम्प पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाअंती कॅम्प परिसरातील बोस लाईन येथील फिलिप सिमोन् सपरप्पा (वय २५) आणि हिंदवाडीतील आदर्श नगर येथील आदित्य नवजित हेड़ा (वय २५) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान झाल्याबाबत माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी अधिक तत्परतेने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.




