बेळगाव लाईव्ह: प्रत्येकाने मानवी मूल्ये आत्मसात करून परस्पर सहकार्याच्या भावनेने जीवन जगावे, असे आवाहन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले.
बेळगाव येथील कॅम्प परिसरातील मेसॉनिक हॉलमध्ये रोटरी क्लब वेणुग्राम, रोटरी क्लब पुणे आणि भारत विकास पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम हात-पाय जुळवणी व वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचे वितरण केले.
हात-पाय गमावून अपंगत्वाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लबकडून राबविण्यात येणारे हे उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. लाभार्थ्यांनी या साधनांचा योग्य उपयोग करून आत्मविश्वासाने दैनंदिन जीवनातील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
रोटरी वेणुग्राम संस्थेचे अध्यक्ष नायक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रोटरी वेणुग्राम संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १,२०० श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये शौचालय बांधणीची कामेही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

५५ लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचे वितरण
या शिबिरात एकूण ५५ लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पायांचे वितरण करण्यात आले. रोटरी संस्थेमुळे आपल्या जीवनात नवी आशा निर्माण झाल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात जपान देशातील प्रतिनिधींची उपस्थिती विशेष ठरली. रोटरी क्लबचे प्रतिनिधी चंद्रकांत राजमाने, डी. बी. पाटील, मल्लिकार्जुन मुरुगोडे, कुणाल बजाज, लोकेश होंगल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.




