बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात उड्डाणपुलांच्या (फ्लायओव्हर) बांधकामासाठी राज्य सरकारकडून २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योजक, विविध संघटना तसेच वकील यांच्याशी सल्लामसलत करून टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करावी, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, बुडा व स्मार्ट सिटी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
फ्लायओव्हर बांधकामासाठी सरकारकडून आधीच निधी मंजूर झाला असून अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. संघटना व वकील यांच्याशी चर्चा केल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक तसेच तिसऱ्या रेल्वे गेटपर्यंत फ्लायओव्हर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत काही इमारती बांधण्यात आल्या आहेत; मात्र अद्याप टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या असून दोन-तीन इमारती तयार असूनही त्यातून कोणतेही भाडे उत्पन्न मिळत नाही. यासाठी तातडीने टेंडर काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेली कामे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. आता त्या कामांसाठी पालिकेकडून लिलाव (ऑक्शन) प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजू टोपण्णावर यांनी बैठकीत मंत्री महोदयांचे लक्ष वेधत सांगितले की, बुडा कडून सीडीपीसाठी टेंडर काढून एक वर्ष झाले तरी कोणतीही प्रगती झालेली नाही. तसेच, बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेले कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर नीट कार्यरत नाही, त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटीचे अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावर स्पष्टीकरण देताना बुडा आयुक्त शकील अहमद यांनी सांगितले की, टेंडर मिळालेल्या कंपनीला बुडा कडून नोटीस बजावण्यात आली आहे. तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात येईल.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, जर सीडीपीचे टेंडर रद्द झाले असेल तर नव्या सीडीपीसाठी तात्काळ टेंडर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडले असून, स्थानिकांना प्राधान्य देऊन टेंडर देत समस्या सोडवाव्यात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीस आमदार आसिफ सेठ, जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.





