बेळगाव लाईव्ह : झाडशहापूर परिसरातील स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी एपीएमसी गेटसमोर आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, परराज्यातून विक्रीसाठी येणाऱ्या गाजरामुळे स्थानिक उत्पादकांवर अन्याय होत आहे. यामुळे त्यांना आपली पिके योग्य भावात विकण्याची संधी मिळत नाही.
शेतकऱ्यांनी एपीएमसी सचिवांना मंगळवारी निवेदन सादर करत अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी चार दिवसांच्या आत त्यांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास, आणखी कठोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, याआधी जय किसान मार्केटसमोरही त्यांनी याच समस्येविरोधात आंदोलन केले होते, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. आता एपीएमसीमध्येही हीच समस्या दिसत असल्याने त्यांनी पुन्हा एकदा आपली मागणी अधोरेखित केली आहे.

शेतकऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे की, स्थानिक गाजर उत्पादकांना त्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळावा, तसेच परराज्याच्या गाजरमुळे निर्माण होणाऱ्या अन्यायाचा निवारण व्हावे मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. एपीएमसी प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन मोठ्या स्वरूपात आंदोलन होणार आहे.




