हलगा -मच्छे बायपासच्या विरोधात शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन

0
375
 belgaum

बेळगाव लाईव्ह :वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा, या मागणीसाठी बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा या रस्त्यावर आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधले.

तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करण्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असूनही हालगा -मच्छे बायपास रस्ता करण्याचा आपला हट्ट सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोडलेला नाही. 

शेतकऱ्यांनी देखील सदर रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचा नाही असा चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने आता बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याच्या निमित्ताने हलगा -मच्छे बायपास रस्ता प्रकल्प रद्द करावा या आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले आहे.

 belgaum

बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी शेतकरी नेते राजू मरवे यांच्या नेतृत्वाखाली ‘रद्द करा रद्द करा हलगा -मच्छे बायपास रद्द करा’ या मागणीचा बॅनर घेऊन बायपासच्या ठिकाणी पुन्हा आंदोलन छेडले. तसेच जोरदार निदर्शने करत सदर बायपास रस्ता रद्द करावा अशी मागणी सरकारकडे केली. त्या आंदोलनात मरवे यांच्यासह सुभाष लाड, गोपाळ सोमण्णाचे, सुरेश मऱ्याक्काचे, शांताराम होसुरकर, सुभाष चौगुले गुंडू भागाण्णाचे, नितीन पैलवाण्णाचे वगैरे बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघाचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे म्हणाले की, गेल्या 2009 पासून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून बेकायदेशीररित्या केला जाणारा हा हलगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करावा अशी या 160 एकर जमिनीतील 1047 आम्ही शेतकरी मागणी करत आहोत. आमची ही जमीन तीबार पीक देणारी आहे. नियम आणि कायद्यानुसार या पद्धतीने वर्षाला तीन पिके देणारी जमीन कोणत्याही विकास कामासाठी वापरता येत नाही. तथापि या नियमासह अन्य सर्व नियम पादळी तुडवून हा बायपास रस्ता केला जात आहे. तेंव्हा सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकार ताबडतोब रद्द करण्याद्वारे या पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

शेतकरी हा देशाचा कणा आहे असे म्हंटले जाते, मात्र या ठिकाणी जर तो कणाच मोडला जात असेल तर सरकारने तात्काळ कायदे नियम तपासून या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सदर रस्त्या संदर्भात यापूर्वी झालेल्या दोन-तीन आंदोलनाप्रसंगी आम्ही पुराव्यासहित मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. बेळगावचा झिरो पॉईंट प्रत्यक्षात शहरातील फिश मार्केट येथे आहे. मात्र तो बेकायदेशीररित्या अलारवाडकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या ठिकाणी बदलण्यात आला आहे. वास्तविक पाहता 2009 चे एक, 2011ची दोन आणि 2018 चे एक अशा एकुण चार गॅझेटमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (ए) जेथे फिश मार्केट आहे तेथून बेळगाव मार्गे खानापूर ते गोव्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र ते निर्देश डावलून बेकायदेशीररित्या हा हलगा -मच्छे बायपास रस्ता केला जात आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर बायपास रस्ता तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची कर्नाटक सरकारला कळकळीची विनंती आहे, असे राजू मरवे शेवटी म्हणाले. यावेळी उपस्थित इतर शेतकऱ्यांनी देखील सदर बायपास रस्त्यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारने तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.