belgaum

९ महिन्यांत १२९४ गुन्हे; २.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त

0
268
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अवैध दारूविक्री, हातभट्टी तसेच ढाब्यांवरील बेकायदा पार्ट्यांना आळा घालण्यासाठी अबकारी विभागाने गेल्या नऊ महिन्यांत बेळगाव व चिक्कोडी विभागात व्यापक मोहीम राबवली आहे. या कालावधीत १२९४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ कोटी २८ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा व संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अबकारी सहआयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत ग्रामीण भागातील अवैध दारूविक्रीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, एकूण कारवाईपैकी ७८३ प्रकरणे ग्रामीण भागातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हातभट्टी रोखण्यासाठी तसेच महामार्गालगतच्या ढाब्यांवर होणाऱ्या बेकायदा पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीट पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांकडून तक्रारी तत्काळ प्राप्त व्हाव्यात यासाठी निवडणूक काळात सुरू असलेली हेल्पलाईन सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 belgaum

दरम्यान, रायबाग येथील एका बारमध्ये पाच वर्षांच्या मुलाला दारू पाजल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संबंधित बारविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अबकारी विभागात सध्या सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्य विक्रेत्यांना कोणतेही विक्री लक्ष्य देण्यात आलेले नसून, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर आणि नवीन वर्षाच्या नावाखाली होणाऱ्या अवैध प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त चलवादी यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला अबकारी जिल्हाधिकारी जगदीश एन. के., निंगनगौडा पाटील, विजय हिरेमठ यांच्यासह विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.