बेळगाव लाईव्ह : डिजिटल व्यसनाधीनतेला आळा घालून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी बेळगाव तालुक्यातील हलगा गावाने एक आदर्शवत आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. गावातील सर्व घरांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल वापर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, या “स्क्रीन-फ्री गाव” उपक्रमाची औपचारिक सुरुवात आज बुधवारपासून करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीसमोर बसवण्यात आलेल्या भोंग्याचे बटन दाबून करण्यात आले. यानुसार दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता आणि रात्री ९ वाजता भोंगा वाजवला जाणार असून, भोंगा वाजताच गावकऱ्यांनी टीव्ही व मोबाईल बंद ठेवायचे आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना सेवा निवृत्त शिक्षक व विधिज्ञ बी. एच. बेळगोजी यांनी सांगितले की, पालकांनी दररोज किमान दोन तास मुलांचा अभ्यास घ्यावा आणि विद्यार्थ्यांना टीव्ही व मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते चारुकिर्ती सैबन्नावर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष गणपत मारीहाळकर, अनिल शिंदे, विलास परीट, बाबू देसाई, मल्लाप्पा कलिंग तसेच ग्रामस्थ, महिला, मराठी व कानडी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाची प्रेरणा हलगा गावाने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अग्रण धुळगाव येथील यशस्वी प्रयोगातून घेतली आहे. अग्रण धुळगावात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भोंगा वाजवला जातो आणि या कालावधीत संपूर्ण गावात टीव्ही व मोबाईल बंद ठेवले जातात. विद्यार्थी अभ्यासात रमलेले असतात, तर कुटुंबीय परस्पर संवाद, वाचन किंवा घरकामांमध्ये व्यस्त असतात. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी काकडे यांनीही विशेष कौतुक केले आहे.

अग्रण धुळगावचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत हलगा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीचे लक्ष या उपक्रमाकडे वेधले. त्यानंतर ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव मंजूर करून छत्रपती शिवस्मारक परिसरात भोंगा बसवण्याचा निर्णय घेतला.
या दोन तासांत विद्यार्थी अभ्यास करतील, तर कुटुंबीय परस्पर संवाद, चर्चा, वाचन व घरकामांमध्ये वेळ घालवतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, तसेच सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
एकंदरित, बेळगाव परिसरात ‘डिजिटल शिस्त’ रुजवणारे पहिले गाव ठरण्याचा मान हलगा गावाने मिळवला असून, हा उपक्रम इतर गावांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


