बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने राज्यातील २३० सरकारी प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न गंभीर होणार आहे. पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले सरकार आता थेट आरोग्य केंद्रेच बंद करून आपली जबाबदारी झटकत असल्याची टीका भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
राज्यातील २३० प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय हा काँग्रेस सरकारच्या वैचारिक आणि आर्थिक दिवाळखोरीचा पुरावा आहे. जर ही सरकारी रुग्णालये बंद झाली, तर सरकारी यंत्रणेवर अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबातील महिलांनी प्रसूतीसाठी नक्की जायचे कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामान्य जनतेला साध्या आरोग्य सुविधाही देता येत नसतील, तर अशा कुचकामी सरकारने सत्तेत राहण्यात काय अर्थ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी काँग्रेस सरकारच्या नियोजनाअभावी आणि दुराचारामुळे अनेक बाळंतिणींना आपला जीव गमवावा लागला होता. आता स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सरकार थेट प्रसूती रुग्णालयांनाच टाळे ठोकण्याचे काम करत असून, हे पाऊल अत्यंत निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सरनोबत यांनी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांना उद्देशून त्यांनी थेट सवाल केला आहे की, खाजगी रुग्णालयांच्या लॉबीला बळी पडून सरकारी आरोग्य यंत्रणा जाणीवपूर्वक खिळखिळी केली जात आहे का? गरीब जनतेबद्दल सरकारला थोडीही सहानुभूती उरलेली नाही का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. पिडीत महिलांच्या शापाला सामोरे जाण्यापूर्वी सरकारने प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा हा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.




