बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेला भुयारी मार्ग अखेर वापरात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या मार्गाचा वापर सुलभ व्हावा यासाठी लोखंडी पायऱ्यांसह पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.
सुमारे १.५ कोटी रुपये खर्च करून या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडणे तसेच नागरिकांची सोय करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, तांत्रिक आणि अन्य कारणांमुळे हा मार्ग अनेक वर्षे बंदच राहिला. देखभालीअभावी यात पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे निरुपयोगी ठरला होता.
भुयारी मार्गात साचलेले पाणी उपसण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी महानगरपालिकेला आतापर्यंत मोठा अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. मूळ उद्देश सफल न झाल्याने या कामावर राजकीय वर्तुळातूनही नेहमीच टीका होत आली असून, जनतेचा पैसा वाया गेल्याचे आरोप करण्यात आले होते.

आता न्यायालय परिसरासमोर फ्लायओव्हरचे बांधकाम प्रस्तावित असल्याने या काळात वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भुयारी मार्ग हा पर्यायी मार्ग म्हणून वापरण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान नागरिकांची गैरसोय टाळता येणार आहे.
प्रवेश सुलभ करण्यासाठी लोखंडी पायऱ्या बसवण्याचे काम सुरू असून, फ्लायओव्हरचे काम सुरू होताच वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी हा भुयारी मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या निर्णयामुळे दीड कोटींच्या खर्चाचे सार्थक होऊन परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.




