बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी भाषिक महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे.
८ डिसेंबर रोजी हा महामेळावा आयोजित करण्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलीस प्रशासनाकडे परवानगीची मागणी केली होती. तथापि, विविध कारणास्तव बेळगाव शहर पोलीस प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली आहे, असे पोलीस आयुक्त बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले की, “महाराष्ट्र एकीकरण समितीने आजच्या ८ डिसेंबरच्या महामेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, काही भिन्न आणि प्रशासकीय कारणांमुळे ती परवानगी नाकारण्यात आली असून, तसे लेखी स्वरूपात आयोजकांना कळविण्यात आले आहे. तरीही समितीने मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही, म. ए. समितीने महामेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बेळगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व्हॅक्सिन डेपो परिसरासह अनेक संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.


