बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संतीबस्तवाड येथील एका नराधम युवकाला बेळगाव जिल्हा पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी ३० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शिक्षा ठोठावण्यात आलेल्या युवकाचे नाव नागराज होळ्याप्पा रंगी (वय २३, रा. शांती गल्ली, संतीस्तवाड, ता.जि. बेळगाव) असे आहे. नागराज याने एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधली होती. त्याने २० डिसेंबर २०२२ रोजी त्या युवतीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी पुढेही अनैतिक संबंध ठेवले. एवढे करून न थांबता २८ एप्रिल २०२३ रोजी त्या अल्पवयीन युवतीचा रुग्णालयात नेऊन गर्भपात देखील केला.
याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय स्पेशल फास्टट्रॅक पोक्सो न्यायालय-०१ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी काल गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर करत, पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षी-पुरावांच्या आधारे नागराज रंगी याला दोषी ठरवले.
तसेच त्याला ३० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, पीडित मुलीला जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पीडित युवतीच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत ही रक्कम ५ वर्षांसाठी ठेव स्वरूपात ठेवली जाणार आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.


