बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन, मूकबधिर आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय तथा विशेष शीघ्रगती पॉक्सो न्यायालय क्र. १, बेळगाव यांनी एका आरोपीस ३० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी कुलगोड पोलिस ठाण्यात आयपीसी आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी अल्पवयीन, मूकबधिर आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे माहीत असूनही, आरोपी इरप्पा मुत्तप्पा दानन्नवर (वय ३०, रा. कौजलगी, ता. गोकाक, जि. बेळगाव) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेने घडलेला प्रकार हावभावांनी कुटुंबीयांना सांगितला. या घटनेनंतर कुलगोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक जी. एस. पाटील यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुडलगीचे पोलिस निरीक्षक श्रीशैल के. ब्याकोड यांनी पुढील तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली. एकूण ८ साक्षीदार, ४४ कागदपत्रे आणि १४ मुद्देमालाच्या आधारावर आरोपी इरप्पा मुत्तप्पा दानन्नवर याच्यावरील आरोप सिद्ध झाले.
न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा आणि ५०,०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच, पीडित बालिकेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे आणि ही नुकसान भरपाईची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. एल. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले व प्रभावी युक्तिवाद केला.




