बेळगाव लाईव्ह : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायद्याचे उल्लंघन करून चालणारे खाजगी व्यवहार आणि अनधिकृत ‘संडे मार्केट’ त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार अधिनियम १९६६ आणि १९६८ नुसार पारदर्शक व्यवहार व्हावेत आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य अध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजीव डोंगरगावी यांनी हे निवेदन दिले. जय किसान असोसिएशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या अनधिकृत संडे मार्केटमुळे भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत असून, याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या निवेदनात प्रामुख्याने जय किसान असोसिएशनद्वारे चालवण्यात येणारे अनधिकृत ‘संडे मार्केट’ त्वरित बंद करून सर्व व्यवहार अधिकृत बाजारपेठेतच करण्याची मागणी केली आहे. एपीएमसी कायद्यानुसार कमिशन एजंटना शेतकऱ्यांकडून कमिशन घेता येत नाही, तरीही सुरू असलेली ही बेकायदेशीर वसुली थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

तसेच, शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात येताच त्याचे वजन त्यांच्यासमोर व्हावे आणि मालाला स्पर्धात्मक दर मिळावेत. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विश्रांतीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारून तिथे पिण्याचे पाणी व स्वच्छतेची सोय करावी.
शहरातील खाजगी ठिकाणी चालणारे फुले, फळे आणि चिंचेचे बाजार तातडीने एपीएमसीच्या अधिकृत आवारात हलवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बाजारात पारदर्शकता आणावी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमांनुसार खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवावे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.



