बेळगाव लाईव्ह : रायबाग तालुक्यातील कुडची-जमखंडी रस्त्यावर आज सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. हाल शिरगूर गावाजवळ सिमेंटची पोती वाहून नेणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याने एका पाचवीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
सिमेंटने भरलेला हा ट्रक कुडचीहून हारूगेरीकडे जात होता. हाल शिरगूर येथील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यार्थ्यांवर पलटी झाला.
यावेळी शाळेत पायी जाणारा अमित कांबळे (वय ११) हा ट्रकखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच प्राण गेला. अमित हा बी.बी. बावी सरकारी शाळेचा विद्यार्थी होता.
या दुर्घटनेत मृत अमितसोबत असलेली त्याची मोठी बहीण अंजली कांबळे आणि भाऊ अविनाश कांबळे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची भीषणता पाहून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी क्रेनच्या मदतीने सिमेंटचा ट्रक उचलून खाली अडकलेल्या मृतदेहाला बाहेर काढले. कुडची पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.




