बेळगाव लाईव्ह :सीमाभागात बेळगावमध्ये गेल्या 1 नोव्हेंबर 2023 रोजी विनापरवानगी काळा दिन मूक सायकल फेरी काढल्या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्ह्यासह दाखल केलेल्या खटल्यात माजी महापौर सरिता पाटील आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांना काल गुरुवारी बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
देशात 1956 मध्ये भाषावार प्रांत रचना करताना तत्कालीन केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर रोजी बेळगावसह मराठी बहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला. त्या दिवसापासून सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो. त्यानुसार गेल्या 1 नोव्हेंबर 2023 रोजी सीमाभागात काळा दिन पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती.
त्यावेळी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली असतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने मुक सायकल फेरी काढली होती. त्यामुळे विनापरवानगी सायकल फेरी काढणे आणि घोषणाबाजी करून भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह अनेक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने काल गुरुवार दि. 18 डिसेंबर रोजी माजी महापौर सरिता पाटील व माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांना 50 हजार रुपयाचा बॉण्ड व तितक्याच रकमेचा जामीन, प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहणे, तसेच अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, अशा अटींवर जामीन मंजूर केला आहे.
या खटल्याची पुढील सुनावणी दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बचावपक्षातर्फे ॲड. महेश बिर्जे ॲड. बाळासाहेब कागणकर ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजीत चौधरी व ॲड. रिचमॅन रिकी हे काम पाहत आहेत.




